Crime 24 Tass

Bhandara: उपविभागीय अधिकाऱ्या वर हल्ल्याप्रकरणी प्रहारच्या तालुकाध्यक्षाला अटक

भंडारा : वाळू तस्करीवर आळा घालण्यासाठी गेलेल्या भंडाऱ्याचे उपविभागीय अधिकारी रवींद्र राठोड यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक राऊत यांच्यावर वाळू तस्करांनी प्राणघातक हल्ला केला होता. या प्रकरणात फरार झालेले प्रहार संघटनेचे पवनी तालुकाध्यक्ष अक्षय तलमले याना अटक करण्यात आली आहे. तर, या हल्ल्यात शिवसेनेचे काही पदाधिकारी सहभागी असल्याचे समोर आले असून, ते फरार झाले आहेत. यामुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. 

उपविभागीय अधिकारी रवींद्र राठोड हे मंडल अधिकारी आणि तलाठी यांच्यासह २७ एप्रिलच्या पहाटे पवनी तालुक्यात सुरू असलेल्या वाळू वाहतुकीच्या कारवाईसाठी गेले होते. दरम्यान, तीन टिप्पर अडविल्यानंतर अचानक २० ते २५ तस्करांनी लाठ्याकाठ्या आणि हातात फावडे घेऊन घटनास्थळ गाठत राठोड यांना मारहाण केली. त्यांच्या बचावासाठी आलेले पवनीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राऊत यांनाही मारहाण झाली. त्यानंतर हल्लेखोर पसार झाले होते. या प्रकरणात पोलिसांनी धर्मेंद्र नखाते, राजेश मेघरे, राहुल काटेखाये, प्रशांत मोहरकर या चौघांना अटक केली आहे. तर,आज अक्षय तलमले याला अटक केली आहे. अक्षय हा राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाचा पवनी तालुकाध्यक्ष आहे, हे विशेष. त्यामुळे आता या प्रकरणात अटक झालेल्यांची संख्या पाच वर पोहोचली आहे. 

या हल्ल्यामध्ये सहभागी असलेल्यांमध्ये शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांचाही समावेश असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी या हल्ल्यात २२ हल्लेखोर असल्याचे चौकशीत निष्पन्न केले असून, त्यांनी पसार असलेल्यांची एक यादी प्रसिद्धीस दिली आहे. त्यात गणेश मुंडले याचा समावेश असून, तो युवासेनेचा पवनी शहराध्यक्ष आहे. तर, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष प्रशांत भुते यांचाही या हल्ल्याच्या कटात सहभाग असल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले असून, ते अटकेच्या भीतीने पसार झाल्याचे समजते. याबाबत प्रशांत भुते यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही. त्यामुळे त्यांची बाजू समजू शकली नाही.

राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या पक्षाच्या पवनी तालुका अध्यक्षाला अटक झाली तर, युवा सेनेचा गणेश मुंडले, शिवसेना तालुकाध्यक्ष प्रशांत भुते हे फरार झाल्याने राजकीय पक्षांचे पदाधिकारी वाळू तस्करीत लिप्त असल्याचे उघड झाले आहे. 

आमदारांनी प्रशासनाला दिला अल्टिमेटम

उपविभागीय अधिकारी राठोड यांच्यावर झालेल्या हल्ल्याला पोलीस प्रशासन कारणीभूत असल्याचा ठपका भंडाऱ्याचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी ठेवला. भोंडेकर हे अपक्ष आमदार म्हणून निवडून आले असले तरीही, ते शिवसेनेचे समर्थक आहेत. याप्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक आणि पवनीचे पोलीस निरीक्षक यांचे निलंबन करावे, अन्यथा सोमवारला आंदोलन करण्याचा इशारा भोंडेकर यांनी दिला आहे. या हल्ल्याच्या प्रकरणात शिवसेना पदाधिकाऱ्यांची नावे पुढे आली असून, ते फरार झाले आहेत. त्यामुळे शिवसेना आता काय भूमिका घेते याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
crime24tass
Author: crime24tass

Leave a Comment

[espro-slider id=28419]