भंडारा : वाळूचा उपसा करून वाहतुक करीत असल्याने शासनाचा लाखोंचा महसूल बुडत आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी संदीप कदम आणि जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव यांनी पहाटे वडेगाव (रिठी) वाळू घाटावर कारवाई केली. या कारवाईत ५५ लाख २१ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून ११ ट्रॅक्टर ताब्यात घेतले आहे. तर, दोन चालकांना अटक केली आहे.
जयदेव बोरकर रा. बेरोडी, महेंद्र हजारे रा. सुरेवाडा असे अटक करण्यात आलेल्या दोन चालकांची नावे आहेत.
भंडारा तालुक्यातील वडेगाव (रीठी) येथून वाळूची अवैध वाहतूक सुरू असल्याच्या माहितीवरुन जिल्हाधिकारी संदीप कदम, जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकारी रविंद्र राठोड, तहसीलदार अरविंद हिंगे, कारधाचे ठाणेदार राजेशकुमार थोरात, सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत मिसाळे यांच्या पथकातील सहायक पोलिस उपनिरीक्षक सुदाम कांबळे, पोलीस हवालदार गिरीश बोरकर, रमेश वाघाडे, प्रमोद आरिकर, क्रांतीस कराडे, रमेश काळे आदींनी वाळू घाटावर मध्यरात्री सापळा रचून कारवाई केली. या कारवाईत ११ ट्रॅक्टर जप्त करण्यात आले आहे. यात ५५ लाख २१ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
