एलसीबीने केली १० तासात आरोपीला अटक
भंडारा : जंगलभ्रमंती दरम्यान मित्रांमध्ये वाद झाला. यातून मित्रांनीच मित्राची धारदार चाकूने हत्या केली. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोघांना अटक केली. ही घटना अड्याळ पोलिस स्टेशन हद्दीतील माडगी – तिर्री (मिन्सी) मार्गावरील जंगलात घडली.
कुशल भरणे (२७) रा. चांदणी चौक, भंडारा मूळ गाव विठ्ठल गुजरी, पवनी, निखिल मेश्राम (२१) रा. समतानगर फेज २, भंडारा असे अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. तर, बाळा उर्फ राकेश रामभाऊ कोवे (२७) रा. मुस्लिम लायब्ररी चौक, अन्सारी वॉर्ड, भंडारा असे मृतकाचे नाव आहे.
मृतक आणि आरोपी हे तिघेही रविवारला जंगलभ्रमंती आणि भिलेवाडा मार्गावरील एका ढाब्यावर जेवण करायच्या बेताने फिरायला एका दुचाकीने निघाले होते. तिघांनी मद्य प्राशन केले आणि वाद निर्माण होऊन मित्रानेच मित्राची चाकूने हत्या केली
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी रीना जनबंधू, ठाणेदार सुधीर बोरकुटे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक जयवंत चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीनचन्द्र राजकुमार, सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत पाटील, पोलीस उपनिरीक्षक विवेक राऊत यांनी घटनास्थळी भेट दिली.
तपासाची चक्रे वेगाने फिरवित आरोपींना अगदी दहा तासात ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी घटनेची कबुली दिली. त्यानंतर दोघानाही अटक करण्यात आली आहे. आरोपींना पकडण्याची कामगिरी पोलीस हवालदार नितीन महाजन, किशोर मेश्राम, पोलिस नायक नंदकिशोर मारबते, अंकुश पुराम, स्नेहल गजभिये, राज कापगते, अमोल खराबे, पोलीस शिपाई मंगेश माळोदे, सुमेध रामटेके आदींनी केली असून घटनेचा अधिक तपास ठाणेदार सुधीर बोरकुटे करीत आहे
