सदस्यत्व रद्द करा : सरपंच संघटनेच्या अध्यक्षाची तक्रार
भंडारा : साकोलीचे काँग्रेस पक्षाचे माजी आमदार मार्तंडराव कापगते यांचे पुत्र तथा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आणि पंचायत समितीचे सदस्य होमराज कापगते यांनी राज्य निवडणूक आयोगाची दिशाभूल केली आहे. ते सेवानिवृत्ती वेतनाचा लाभ उचलत असतानाही त्यांनी निवडणूक नामनिर्देशन अर्जात त्याची नोंद केली नाही. यामाध्यमातून त्यांनी निवडणूक आयोगाची दिशाभूल केल्याने त्यांच्यावर फौजदारी कारवाई करून सदस्यत्व रद्द करावे, अशी मागणी सरपंच संघटनेचे अध्यक्ष पवनकुमार शेंडे यांनी केली आहे.
होमराज कापगते हे यापूर्वी काँग्रेचे जिल्हा परिषद सदस्य राहिले आहेत. होमराज हे त्यांच्या संस्थेतून प्राचार्य म्हणून सेवानिवृत्त झाले असून सेवानिवृत्तीचा लाभ ते घेत आहेत. असे असताना त्यांनी डिसेंबरला पार पडलेल्या पंचायत समितीच्या निवडणुकीत काँग्रेसच्या तिकिटावरून निवडणूक लढविली. त्यात त्यांच्या नामनिर्देशन अर्जात उत्पन्नाचे साधन हे सेवानिवृत्ती वेतनाचा उल्लेख न करता केवळ शेतीचे उत्पन्न असे नमूद केले आहे.
होमराज हे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आहेत. विशेष म्हणजे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पटोले यांचे ते अत्यंत विश्वासू म्हणून ओळखल्या जाते. नाना पटोले यांच्या क्षेत्रातील काँग्रेस सदस्याने थेट राज्य निवडणूक आयोगाची फसवणूक केल्याचे प्रकरण समोर आल्याने जिल्ह्यात राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. सरपंच संघटनेचे अध्यक्ष पवनकुमार शेंडे यांनी याबाबत, २८ फेब्रुवारी २०२२ ला राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे.
या तक्रारीच्या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाचे कक्ष अधिकारी सू. तू. आरोलकर यांनी भंडारा जिल्हाधिकारी यांना १४ मार्च ला पत्र पाठवून तक्रारीची शहानिशा करून तथ्य आढळल्यास कार्यवाही करून अनुपालन अहवाल राज्य निवडणूक आयोगास सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. उद्या साकोली पंचायत समितीच्या सभापती पदाची निवडणूक होत असल्याने होमराज कापगते यांच्यावर कारवाई होणार का? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. याबाबत होमराज कापगते यांच्याशी वारंवार संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
