अड्याळ येथील थरार : सायकलने पळून जाणाऱ्या मुलाला राष्ट्रीय महामार्गावर अटक
भंडारा : शेतीसह सर्व संपत्तीचे हिस्से वाटणी करावी या मागणीला घेऊन संतप्त मुलाने वडीलांवर कुर्हाडीने वार करुन त्यांची हत्या केली. अड्याळ पोलिस स्टेशन हद्दीतील फनोली या गावात मध्यरात्री घडला. अड्याळ पोलिसांनी आरोपीला भंडाराजवळून अटक केली.
शंकर महादेव कावळे (६०) रा. फनोली असे मृतकाचे नाव आहे. तर दुर्योधन शंकर कावळे (३२) असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपी मुलाचे नाव आहे.
मृतक शंकर यांना दोन मुले आहेत. त्यांच्याकडे दोन एकर शेती आहे. मागील काही दिवसांपासून आरोपी दुर्योधन हा वडील शंकर यांच्याकडे शेतीची हिस्से वाटणी करावी, असा तगादा लावीत होता. वडील या गोष्टीला मानत नसल्याचे बघून गुरुवारच्या मध्यरात्री वडील हे घराच्या अंगणात खाटेवर झोपल्याचे बघून मुलगा दुर्योधन याने त्यांच्यावर कुऱ्हाडीने सपासप वार करून वडिलांची निर्दयी हत्या केली. त्यानंतर दुर्योधनाने तिथून पळ काढला होता. याप्रकरणी कुटुंबीयांनी अड्याळचे ठाणेदार सुधीर बोरकुटे यांना घटनेची माहिती दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून बोरकुटे हे आपल्या पोलिस पथकासह फनोली येथे घटनास्थळी पोहोचले.
दरम्यान, आरोपी मुलगा दुर्योधनाने गावावरून पळ काढताना सायकल चोरली. सायकलनेच तो राष्ट्रीय महामार्गावरून भंडारा मार्गे नागपूरकडे निघाला होता. याची माहिती मिळताच अड्याळ पोलिसांनी त्याचा पाठलाग करून राष्ट्रीय महामार्गावरील मुजबी गावाजवळ त्याला ताब्यात घेतले. श्रावण कावळे यांच्या तक्रारीवरून अड्याळ पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली आहे. घटनेचा अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी रिना जनबंधू यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार सुधीर बोरकुटे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक हरी इंगोले, पोलीस उपनिरीक्षक प्रियंका बोदमले, पोलीस हवालदार सुभाष मस्के, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सोरते, पोलीस हवालदार कमाने, जितू वैद्य, संदीप नवरखेडे, हर्षा मांढरे, रितेश हलमारे, सुभाष रहांगडाले, भूषण मेश्राम, मनोज राणे आदी करीत आहे.
