सभापतींचा नवा संकल्प : शेवटच्या घटकापर्यंत शासकीय योजना पोहचविणार
भंडारा : कोरोनाच्या काळात शासकीय निधीची वणवा होती. त्यामुळे अनेकांना शासकीय योजनांचा लाभ मिळाला नाही. नागरिकांना पंचायत समितीमध्ये अनेकदा खेटा घालाव्या लागल्या. अशा प्रत्येक नागरिकांना शासकीय नियमानुसार योजनांचा लाभ देण्याचा आपला प्रयत्न राहील. किंबहुना नागरिकांना शासकीय योजनांची माहिती व्हावी आणि त्याचा लाभ मिळावा यासाठी नागरिकांच्या समस्यांचा निपटारा त्यांच्या गावात व्हावा, यादृष्टीने पाहिले पाऊल उचलले जाणार आहे. जिल्हा परिषद निहाय जनता दरबार घेऊन नागरिकांच्या समस्या त्यांच्याच दारात सोडविण्याचा प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया साकोली पंचायत समितीचे नवनियुक्त सभापती गणेश आदे यांनी दिली.
ग्रामीण नागरिकांना शासकीय योजनांची पूर्ण माहिती नसल्याने त्यांना योजनेपासून वंचित रहावे लागते. यामुळे अनेकदा शासकीय कर्मचारी किंवा अधिकारी योग्य गरजुला लाभ देण्यास असमर्थ ठरतात. काँग्रेसची धेय्य धोरण, शासकीय योजना आणि त्याचा लाभ खऱ्या लाभार्थ्यांना मिळवून देण्यासाठी माझा पहिला प्रयत्न राहणार असल्याची प्रतिक्रिया सभापती गणेश आदे यांनी दिली. भूतकाळात काय झाले. लाभार्थी योजनांपासून वंचित का राहीले. याचा पाठपुरावा करण्यात येईल. त्यात कोण दोषी आहे, याचाही अभ्यास करण्यात येईल. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कामात कुचाराईपणा केली असल्यास त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही करण्याचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविण्यात येईल.
पंचायत समितीला प्राप्त झालेला निधी व खर्च झालेल्या निधीची माहिती घेण्यात येईल. सोबतच पंचायत समितीच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या योजनांची अंमलबजावणी करण्यात आली का किंवा विकास कामे प्रलंबित असल्यास त्यांची माहिती घेण्यात येईल. त्यात काही काळेबेरे आढळून आल्यास कोणाचीही गय करणार नाही. शासकीय योजनांपासून कोणताही व्यक्ती जर तो पात्र असल्यास त्याला योजनांचा लाभ मिळवून देण्याचा माझा पूर्ण प्रयत्न राहणार आहे. यासाठी दोन पंचायत समिती मिळून होणाऱ्या एका जिल्हा परिषद क्षेत्रात पुढील १५ दिवसांपासून ‘पंचायत समिती आपल्या दारी’ हा लोकोपयोगी कार्यक्रम सुरू करणार आहे. या माध्यमातून नागरिकांच्या समस्या आणि त्यांच्या अडचणींचा विचार करण्यात येईल. किंबहुना त्यांच्याकडून त्याचे लेखी निवेदन घेण्यात येईल. या लोकोपयोगी उपक्रमात शिक्षण, पाणीपुरवठा, महसूल, वन विभाग यासह सर्व विभागाचे जबाबदार अधिकारी, कर्मचारी उपस्थित राहतील. नागरिकांच्या समस्या या उपक्रमात सोडविण्याचा मानस असल्याचे सभापती आदे यांनी स्पष्ट केले.
