परिसरात खळबळ; जिलेटिनच्या 55 कांड्या पाहून पोलीसही चक्रावले
नागपूर : रेल्वे स्टेशनसारख्या गजबजलेल्या परिसरात बॉम्ब सदृश्य वस्तू आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. रेल्वे स्टेशनच्या (Railway Station) मुख्य प्रवेशद्वाराजवळ असलेल्या ट्राफिक पोलीस चौकीच्या मागेच एक बॅग आढळून आली.
माहिती मिळताच पोलीस आणि बॉम्ब शोधक पथक (Bomb Squad) घटनास्थळी दाखल झालं आणि त्यांनी बॅग ताब्यात घेतली. या बॅगेत जिलेटिनच्या 55 कांड्या एकमेकांशी सर्किटने जोडलेल्या स्वरुपात होत्या. त्यामुळे परिस्थितीचं गांभीर्य ओळखून पोलिसांनी ती बॉम्ब सदृश्य वस्तू ताब्यात घेत पोलीस मुख्यालय (Police Headquarters) परिसरात नेली. रेल्वे स्टेशन परिसरात अशाप्रकारे बेवारस बॅगमध्ये बॉम्ब सदृश्य वस्तू आढळून आल्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली.
जिलेटिनच्या कांड्या सर्किटद्वारे एकमेकांना जोडलेल्या अवस्थेत
रेल्वे स्टेशन परिसरात एक बेवारस बॅग आढळून आल्याची माहिती मिळताच डॉग स्कॉड, BDDS चं पथक घटनास्थळी दाखल झालं. त्यांनी बॅगेची तपासणी केली असता त्यात जिलेटिनच्या कांड्या सर्किटद्वारे एकमेकांना जोडलेल्या अवस्थेत आढळल्या. त्यामुळे रेल्वे स्टेशनच्या मुख्य दारावर तसेच समोरील रस्त्यावरील वाहतूक काही वेळासाठी बंद करण्यात आली. बॉम्ब शोधक पथकाने ती बॅग ताब्यात घेऊन विशेष गाडीने पोलीस मुख्यालयात नेण्यात आली आहे.
CCTV फुटेजद्वारे तपास सुरु
रेल्वे प्रवासात कुठलीही ज्वलनशील वस्तू किंवा पदार्थ घेऊन जाण्यास मनाई आहे. अशावेळी जिलेटीनच्या कांड्यांनी भरलेली बॅग रेल्वे स्टेशन परिसरात कुणी आणि का ठेवली? याचा तपास आता नागपूर पोलीस करत आहेत. त्यासाठी रेल्वे स्टेशन परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासलं जात आहे.
