भंडारा : जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवडणूक १० मे ला पार पडली. या निवडणुकी दरम्यान सभागृहात भाजपच्या दोन गटात वाद निर्माण होऊन प्रकरण हाणामारीवर पोहोचले. दरम्यान, भाजपच्या महिला जिल्हा परिषद सदस्य माहेश्वरी नेवारे यांच्या गळ्यातील मंगळसूत्र तुटले. या प्रकरणी महिला सदस्याच्या तक्रारीवरून भंडारा पोलिसात जिल्हा परिषदचे नवनियुक्त उपाध्यक्ष संदीप टाले यांच्यासह तुमसर पंचायत समितीचे सभापती नंदू रहांगडाले, जिल्हा परिषद सदस्य उमेश भास्कर पाटील यांच्याविरुद्ध महिलेच्या तक्रारीवरून विनयभंगासह ऍट्रॉसिटी अंतर्गत भंडारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
तर, उपाध्यक्ष संदीप टाले यांच्या तक्रारीवरून भाजपचे गटनेता विनोद बांते, जिल्हा परिषद सदस्य प्रियांक बोरकर, जिल्हा परिषद सदस्य गणेश निरगुडे आणी जिल्हा परिषद सदस्य माहेश्वरी नेवारे यांच्याविरोधात अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याच्या उद्देशाने मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाने राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. घटनेचा अधिक तपास भंडाऱ्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी विजय डोळस आणि पोलिस निरीक्षक सुभाष बारसे करीत आहे.
