ठाणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर अभिनेत्री केतकी चितळेने फेसबुकवर शेअर केलेल्या पोस्टवरून मोठ्या वादाला सुरूवात झाली आहे. केतकीच्या विरोधात ठाणे आणि पुण्यात गुन्हा दाखल झाला असून राष्ट्रवादी काँग्रेसने तिच्या अटकेची मागणी केली आहे. अशात पक्षाचे नेते आणि मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केतकीवर हल्ला चढवला आहे.
केतकीने ज्यापद्धतीने टीका केली आहे, त्यातून त्यांच्या मनातील विकृती बाहेर आली असून यावर महाराष्ट्रातील सर्व स्थरातून टीका होत आहे. आमच्या भगिनी (केतकी) जे काही लिहले आहे, ते अत्यंत घाणेरडेपणाचे आहे, असे आव्हाड म्हणाले. शरद पवार हे मनाने खुप मोठे आहेत आणि मी जर पूर्वीचा जितेंद्र आव्हाड असतो तर आता ज्या पद्धतीने प्रतिक्रिया देत आहे तशा पद्धतीने व्यक्त झालो नसतो.
कार्यकर्ता वेडा असतो
मी मर्यादा पाळतो मात्र कार्यकर्त्याचे तसे नसते. तुम्ही खालच्या पातळीवर टाका केली तर कार्यकर्त्याचे मस्तक भडकू शकते. कार्यकर्ता हा वेडा असतो त्याचे पवारांवर आई-बाबसारखे प्रेम असते. तुम्ही इतक्या खालच्या पातळीवर जाऊन आमच्या बापाबद्दल लिहू शकत नाही. मी कोणाला पाय लावून देणार नाही आणि पाय लावला तर सहन करून देणार नाही, असे आव्हाड म्हणाले.
आम्ही राजकीय टीकेवर सडेतोड उत्तर देतो. अशा प्रकारच्या लढाईत मजा येते. ही एक वैचारिक लढाई आहे. पवार ब्राम्हणांच्या विरोधात वैगरे काही नाहीत. ब्राह्मणवाद हा मनुस्मृती मधून जन्माला आल्याचे आव्हाड म्हणाले.
केतकीविरोधात गुन्हा दाखल
राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक शहर अध्यक्ष स्वप्नील नेटके यांनी कळवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. केतकी चितळेनं ही पोस्ट केल्यामुळं पक्षातील नेते, कार्यकर्ते आणि लोकांमध्ये तीव्र नाराजी आहे. त्यामुळं कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. केतकीनं ही पोस्ट करुन दोन राजकीय पक्षांमध्ये द्वेषाची भावना, तेढ निर्माण करण्याचे कृत्य केलं आहे. शरद पवार यांना उद्देशून बदनामीकारक, मानहानीकारक पोस्ट केतकीनं केली, असं नेटके यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं आहे. कळवा पोलीसांनी केतकीविरोधात कलम ५०५(२), ५००,५०१, १५३ ए नुसार कळवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
