भंडारा : मेथीच्या आळणासाठी (भाजी) आई-वडिलांना शिविगाळ करणाऱ्या दिराला मोठ्या वहिनीने हटकल्याने दीराने चक्क वहिनीच्या गालावर ब्लेडने हल्ला केला. अंगावर काटा आणणारी ही संतापजनक घटना भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील जांभोरा येथे घडली आहे.
देवका वासुदेव तलांजे (वय 40) असे जखमी वहिनीचे नाव असून नरेश गोविंद तलांजे (वय 35) असे आरोपी दीराचे नाव आहे. या घटनेनंतर आरोपी दीर फरार झाला असून त्याचा करडी पोलीस त्याचा शोध घेत आहेत. (Bhandara Latest Marathi News)
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी नरेशच्या आईने सायंकाळी भाजीसाठी विशेष नसल्याने मेथीचे आळण बनविले होते. मात्र नरेशला ते आवडले नाही. जेवणात दुसरी भाजी का केली नाही त्यावरून त्याने आई आणि वडिलांना शिविगाळ सुरु केली. दरम्यान घराजवळच वेगळी राहत असलेली मोठी सून देवका यांना हा प्रकार ऐकू आला. त्यावरून जखमी देवका यांनी घरात येथे नरेशला जाब विचारला असता, संतापलेल्या दीराने चक्क घरातून ब्लेड आणत वहिनीच्या गालावर ब्लेडने वार केला.
दरम्यान, दीराने ब्लेडने देवका यांच्या गालावर वार केल्याने यामध्ये देवका यांना गंभीर जखम झाली. त्याचवेळी घरात उपस्थित असलेल्या इतर सदस्यांनी देवका यांना रुग्णालयात दाखल केलं. या सर्व प्रकारानंतर आरोपी नरेश याने घरातून धूम ठोकली. रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर देवका यांनी आपला दीर नरेश याच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. देवका यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून करडी पोलीस आरोपीचा शोध घेत आहे.
