जावयाचा मृत्यू तर पत्नीसह सासरची मंडळी गंभीर
भंडारा : वृध्द आजस सासूला भेटायला जाणाऱ्या भंडारा येथील एका कुटुंबाच्या वाहनाला नागपूर येथे भीषण अपघात झाला. यात जावयाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर, पत्नीसह सासरची मंडळी गंभीर जखमी झाले. यात दोन वर्षीय बालिका सुखरूप बचावली. हा अपघात नागपूर येथे घडला.
सागर सुभाष भुरे (३२) रा. गांधी वार्ड गणेशपूर, भंडारा असे मृतक जावयाचे नाव आहे. तर, पत्नी कांचल, कृष्णकांत मोटघरे (सासरे), सुनंदा मोटघरे (सासू), कृणाल मोटघरे (साळा) हे गंभीर जखमी आहे. तर, या भीषण अपघातात मृतक सागरची दोन वर्षीय बालिका किमी ही सुखरूप बचावली. मृतक सागरची सासुरवाडी भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथील आहे. नागपूर येथील आजस सासू ही बाजेला खिळून असल्याने त्यांची भेट घेण्यासाठी हे सर्व सकाळी एमएच ३६ एच ७३२५ या मारोती व्हॅन ने नागपूरला निघाले होते. पांजरा – खापरी फाट्यावर भरधाव ट्रकने त्यांच्या व्हॅनला जबर धडक दिल्याने हा अपघात झाला. या अपघातात सागरचा मृत्यू झाल्याची माहिती गणेशपूर येथे पोहचताच सर्वत्र शोककळा पसरली. गंभीर सर्वांवर नागपूर येथे उपचार सुरू असून मृतक सागरच्या पार्थिवावर रात्री गणेशपूर येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
