भंडारा : भंडारा येथून वरठी येथील सनफ्लॅग कंपनीकडे जाणाऱ्या वाहनाचा मध्यरात्री भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की या अपघातात सनफ्लॅग कंपनीचे टेक्निशियन रमेश टंडन यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर, डेप्युटी मॅनेजर युवराज भूरे हे गंभीर जखमी झाले. हे दोघेही मोहाडी तालुक्यातील वरठी येथील सनफ्लॅग कंपनीत नोकरीवर आहेत.
काही महत्त्वाच्या कामाकरिता हे दोघेही रमेश टंडन यांच्या चारचाकी वाहनाने भंडारा येथे आले होते. काम आटोपून दोघेही वरठीकडे परत निघाले होते. दरम्यान, सिरसीजवळ अज्ञात वाहनाने त्यांच्या वाहनाला जबर धडक दिली. यात टंडन यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर, गंभीर जखमी झालेल्या भुरे यांना प्रथम जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे नेण्यात आले. मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना नागपुर येथे हलविण्यात आले.
