एकरी 16 क्विंटल धान खरेदी होणार
भंडारा गोंदिया जिल्ह्यातील रब्बी धानाच्या शासकीय खरेदी बाबत महाराष्ट्र राज्य शासनाने पाठविलेल्या चुकीच्या माहितीमुळे धान उत्पादक शेतकरी काळजीत पडला होता. शेतकऱ्यांची ही चिंता दूर करण्याच्या दृष्टीने खा. सुनिल मेंढे यांनी दिल्ली येथे अधिग्रहण आणि सार्वजनिक वितरण धोरणाचे संचालक (Policy Director) श्री. मकरंद फडके यांच्याशी चर्चा केली.
राज्य शासनाने केंद्राला पाठविलेल्या अपुऱ्या व त्रोटक माहितीमुळे मागील वर्षीएवढे धान खरेदीचे उद्दिष्ट केंद्र शासन देऊ शकले नाही. धानाबाबतची योग्य माहिती पाठविल्यावर धान खरेदीचे उद्दिष्ट वाढवून देण्यात येईल. तसेच दोन्ही जिल्ह्यातील कोणताही धान उत्पादक शेतकरी शासकीय धान खरेदी पासून वंचित राहणार नाही या दृष्टीने केंद्र सरकार सर्वतोपरी काळजी घेईल असे खा.मेंढे यांनी सांगितले.
शेतकऱ्यांकडून एकरी फक्त ८ क्विंटल धान खरेदी होईल अशी चुकीची व दिशाभूल करणारी माहिती पसरवली जात होती. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला होता. परंतु आज केंद्र स्तरावर झालेल्या चर्चे प्रमाणे एकरी 16 क्विंटल धान खरेदी होणार आहे. शेतकऱ्यांनी त्यामुळे कुठलीही चिंता करू नये असे खा.सुनील मेंढे यांनी सांगितले.
