Crime 24 Tass

इंग्रजीत बोलणे, खाकी वर्दी पण तोतया अधिकारी; MPSC जॉब न मिळाल्याने निवडला चुकीचा मार्ग

नांदेड : उच्च शिक्षणानंतरही शासकीय नोकरी न मिळाल्याने अनोखी शक्कल लढवीत चक्क वन विभागाची खाकी वर्दी घालून गंडविणाऱ्या कपिल गणपतराव पाईकराव या तरुणाला स्थानिक गुन्हे शाखेने पकडले आहे.

अस्खलित इंग्रजी बोलणारा हा तरुण सॉ-मिलला भेटी देऊन पैसे उकळत होता. मंगळवारी रात्रीच्या वेळी रस्त्यावरून जाणारी लाकडांची वाहने अडविण्यासाठी तो थांबला अन् पोलिसांच्या गळाला लागला.

हदगाव तालुक्यातील निवघा येथील कपिल गणपतराव पाईकराव याचा जन्म ६ डिसेंबर १९९१ ला झाला होता. घरची आर्थिक परिस्थिती जेमतेम. कपिल हा शिक्षणात हुशार होता. त्याने बीसीए अभ्यासक्रमातून पदवी घेतली. मध्यंतरी त्याने काही वर्षे स्पर्धा परीक्षेची तयारीही केली होती; परंतु वारंवार त्याला त्यात अपयश येत होते. शासकीय नोकरी मिळण्याच्या सर्व आशा मावळल्याने त्याने तोतया अधिकारी बनण्याची शक्कल लढविली. त्यासाठी वन विभागाची निवड केली. वन विभागाच्या प्रधान मुख्य वनसंरक्षकांच्या स्वाक्षरीचे बनावट ओळखपत्रही तयार केले, तसेच रेंज अधिकाऱ्याप्रमाणे खाकी वर्दीही शिऊन घेतली. आपल्या दुचाकीवरही त्याने वन विभागाचे फिरते पथक असे स्टिकर लावले होते. त्यामुळे कुणालाही त्याच्यावर संशय येत नव्हता.

किनवट आणि माहूर तालुक्यात सॉ-मिलला भेटी देऊन तो अधिकारी असल्याच्या थाटात तपासणी करायचा. अनेक त्रुटी काढून नंतर तडजोड करून रक्कम उकळायचा. गेल्या अनेक महिन्यांपासून त्याचा हा उद्योग सुरू होता. परंतु मंगळवारी रात्री स्थानिक गुन्हे शाखेला खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीवरून लातूर फाटा ते डेअरी चौक भागातून त्याला ताब्यात घेण्यात आले. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या पाईकराव याने नंतर तोतया अधिकारी असल्याची कबुली पोउपनि दत्तात्रय काळे यांना दिली. या प्रकरणात रात्री नांदेड ग्रामीण पोलिसांनी पाईकराव विरोधात गुन्हा नोंदविला आहे. त्याने परिधान केलेली खाकी वर्दीही जप्त करण्यात आली आहे.

फसवणूक झाल्यास तक्रार करा
वन विभागाचा अधिकारी बनून कपिल पाईकराव याने अनेक लाकडी मिल चालकांकडून रक्कम उकळल्याची शक्यता आहे. परंतु, त्याबाबत कुणीही तक्रार केली नाही. कुणाची फसवणूक झाल्यास त्यांनी नांदेड ग्रामीण पोलीस किंवा स्थान्बिक गुन्हे शाखेकडे तक्रार करावी, असे आवाहन पोलीस दलाकडून करण्यात आले आहे.

crime24tass
Author: crime24tass

Leave a Comment

[espro-slider id=28419]