केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची घोषणा
लाखनी, साकोली उड्डाणपुलाचे लोकार्पण
भंडारा : पायाभूत सुविधांच्या माध्यमातून जिल्ह्याचा विकास साधण्याचा प्रयत्न सातत्याने होत आहे. पर्यटन विकासातून रोजगार यावर काम सुरूच आहे. अन्य माध्यमातूनही रोजगार देण्याच्या दृष्टीने आम्ही कटिबद्ध असून जिल्ह्यात साखर कारखान्यात सहाशे कोटी रुपयांची नवीन गुंतवणूक करून इथेनॉल निर्मितीचा प्रकल्प सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय महामार्ग व रस्ते वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी यांनी आज साकोली येथे एका कार्यक्रमादरम्यान केली.
जिल्ह्यातील साकोली आणि लाखनी येथे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण द्वारा निर्मित उड्डाणपुलाच्या लोकार्पण सोहळ्याचे आयोजन आज 29 मे रोजी साकोली येथे करण्यात आले होते. यावेळी केंद्रीय मंत्री नितिनजी गडकरी बोलत होते. व्यासपीठावर आमदार डॉ. परिणय फुके, माजी मंत्री राजकुमारजी बडोले, भाजप जिल्हाध्यक्ष शिवराम गिर्हेपुंजे, तारिक कुरेशी, माजी खा.शिशुपाल पटले, डॉ.हेमकृष्ण कापगते, माजी आमदार बाळा काशिवार, जिल्हाधिकारी संदीप कदम, सौ.इंद्रायणीताई कापगते, सौ.रेखाताई भाजीपाले, जिल्हा परिषद सदस्या सौ.माहेश्वरीताई नेवारे, सौ.वनिताताई डोये, गजानन निरगुडे, राजेश बांते, भोजराम कापगते, लाखनी नगराध्यक्षा सौ.त्रिवेणीताई पोहरकर, सौ.धनवंता राऊत, साकोली तालुकाध्यक्ष लखन बर्वे, मनीष कापगते, नेपाल रंगारी, किशोर पोगळे आदी उपस्थित होते.
प्रास्ताविक राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे राजीव अग्रवाल यांनी केले. एकेरी स्तंभावर उभा असलेला हा देशातील पहिला पूल असून जल पुनर्भरणाच्या दृष्टीनेही संपूर्ण नियोजन करण्यात आले आहे. या पूर्ण निर्मितीमुळे महामार्गा वरील पाच अपघातप्रवण स्थळे दूर करण्यात आम्ही यशस्वी झालो असे सांगताना एक लाख वृक्षांची लागवडही या दरम्यान करण्यात आली असल्याचे त्यांनी
उपस्थितांना संबोधित करताना नितीन गडकरी पुढे म्हणाले, भंडारा जिल्ह्यातील हे दोन्ही पूल भविष्यात स्टेट ऑफ आर्ट म्हणून ओळखले जातील. जेव्हा कधी उत्कृष्ट बांधकामाच्या उड्डाणपुलाला पुरस्कार देण्याची वेळ येईल तेव्हा लाखनी आणि साकोलीचा नक्कीच विचार केला जाईल असेही गडकरी म्हणाले.
पुलाला स्व.शामराव बापू कापगते यांचे नाव देण्यात यावे,
अशी मागणी सातत्याने होत होती. शामराव बापूंचे कार्य पहाता ती मागणी नक्कीच योग्य होती. त्यांनी समाजासाठी प्रामाणिक पणे कार्य करून समाज घडविला असे म्हणत यापुढे साकोली चा उड्डाणपूल स्वर्गीय शामराव बापू कापगते उड्डाणपूल या नावाने ओळखला जाईल अशी घोषणा त्यांनी केली.
वेगवेगळ्या माध्यमातून विकास साधण्याचा मानस आमचा आहे.
सोबतच शेतकरीही समृद्ध व्हावा हा प्रयत्न आहे. गोसीखुर्द प्रकल्पाच्या बॅक वॉटरच्या माध्यमातून विकास करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू झाले असून त्यातून रोजगार निर्मितीचे स्वप्न आहे. सोबतच साखर कारखान्यात सहाशे कोटी रुपयांची गुंतवणूक करून चार लाख लिटर इथेनॉल निर्मिती क्षमतेचा प्रकल्प लवकरच उभारला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकल्पाच्या माध्यमातून 5000 लोकांना रोजगार मिळेल असे सांगताना तीन महिन्यात प्रकल्पाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होईल असेही गडकरी म्हणाले. भविष्यात कारखान्याची गाळप क्षमता वाढविली जाणार आहे. या कारखाण्यामुळे जिल्ह्यात क्रांती येईल, असा विश्वासही नितिन गडकरी यांनी व्यक्त केला.
नितिनजींमुळे जिल्ह्यात विकास आला : खा.सुनील मेंढे
