स्थानिक पोलीस अनभिज्ञ : नागपूरच्या डीसीपी नुरुल हसन यांच्या पथकाची कारवाई
भंडारा : पन्नासपेक्षा अधिक गुन्ह्यात आरोपी असलेला कुख्यात गँगस्टर आबू खानला नागपूर पोलिसांनी आज भंडारा शहरातून भल्या पहाटे अटक केली. या अटकेच्या कारवाईची भंडारा पोलिसांना पुसटशीही कल्पना नाही, हे विशेष.
नागपूर येथील आबु खान याच्यावर ५० पेक्षा अधिक गुन्हे असल्याची माहिती आहे.
त्याच्यावर मोक्का लागल्यानंतर न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळला होता. तेव्हापासून तो फरार झाला होता. विविध गुन्ह्यात आरोपी आसलेल्या फरार आबु खानच्या मागावर नागपूर पोलीस होते. मात्र, विविध शहरात नाव बदलवून राहणारा आबु पोलिसांना नेहमी गुंगारा देत होता. विदर्भातील अमरावती, गडचिरोली या शहरासह गुजरातमधील अहमदाबाद येथेही तो काही दिवस राहिला आहे.
त्याच्या ठिकाणाबद्दल मिळालेल्या गुप्त माहितीवरून पोलिसांनी अनेकदा तो राहत असलेल्या ठिकाणी छापे घातले. मात्र, प्रत्येकवेळी तो पोलिसांना चकमा देऊन पळण्यात यशस्वी झाला. विविध गुन्ह्यात आरोपी असलेला कुख्यात गँगस्टर आबु खान याच्यावर पन्नासपेक्षा अधिक गुन्हे असल्याने त्याला कुठल्याही परिस्थितीत पकडणे नागपूर पोलिसांना एक मोठे आव्हान ठरले होते. नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपायुक्त नरुल हसन यांचे विशेष पथक आबु खान याच्या मागावर होते.
मागील काही दिवसांपासून आबु खान हा भंडारा शहरात असल्याची गुप्त माहिती त्यांना मिळाली. काही दिवस त्याच्यावर गुप्त पाळत ठेवून नागपूर पोलिसांनी त्याला रविवारी पहाटे भंडारा शहरातून मोठ्या शिताफीने अटक केली. आबु खानला भंडारा शहरातून अटक करून पोलीस नागपूरला गेल्यानंतरही भंडारा पोलिसांना या कारवाईबाबत पुसटशीही कल्पना नाही. यावरूनच नागपूर पोलिसांनी आबु खानला अटक करण्याच्या कारवाईची कमालीची गुप्तता पाळली होती, हे यावरून लक्षात येते.
