भंडारा : बारावीचा निकाल घोषित झाला आणि अपेक्षित गुण मिळाले नाही. त्यामुळे अपेक्षाभंग झालेल्या बारावीच्या विद्यार्थिनीने तांदळाला लावायचे औषध (पावडर) खाल्ले. शरीरात विषाचे प्रमाण जास्त झाल्याने तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना लाखनी येथे आज बुधवारी दुपारी घडली.
मयुरी किशोर वंजारी रा. लाखनी असे विद्यार्थिनीचे नाव आहे. मयुरी ही लाखनी येथील समर्थ महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे. दुपारी बारावीचा निकाल घोषित झाला. मयुरीचे आई वडील मजुरी करतात. आई वडिलांचा भविष्यात आधार बनता यावे, हा दृष्टीकोन मयुरीने ठेवला होता.
मयुरीने शिकवणी विना घरीच अभ्यास करून परीक्षा दिली. तिला निकालाची उत्सुकता लागली होती. दुपारी निकाल घोषित झाला आणि तिला केवळ ५५ टक्केच गुण मिळाले. निकाल बघून घरी आल्यावर तिने घरातील तांदळाला अळी लागू नये म्हणून लावायचे औषध (पावडर) खाल्ले.
ही बाब कुटुंबियांच्या लक्षात येताच त्यांनी मयुरीला तातडीने लाखनी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, प्रकृती अत्यवस्थ असल्याने पुढील उपचारासाठी तिला भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले. उपचारादरम्यान तिचा भंडारा येथे मृत्यू झाला. दरम्यान घटनेची माहिती मिळताच लाखनीचे पोलिस निरीक्षक मिलिंद तायडे, पोलिस उपनिरीक्षक अमोल तांबे हे घटनास्थळी पोहचले.
