भंडारा : वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रकवर कायदेशीर कारवाई न करण्यासाठी मोबाईलवर पैशाची मागणी केली. मोबाईलवरील संभाषणावरून भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दोघांना अटक केली. अटक केलेल्यांमध्ये मंडळ अधिकारी आणि भंडाऱ्याचे तहसीलदार यांच्या वाहनचालकाचा समावेश आहे. अविनाश राठोड (४४) आणि रामू नेवारे (५६) असे लाच मागितल्या प्रकरणी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. तक्रारदार हे मोहाडी तालुक्यातील रोहा येथील आहे. त्यांचे हार्डवेअरचे दुकान असून रेती पुरवठा करण्याचे काम ते करतात. ७ जूनला भंडारा तहसीलदार आणि महसूल कर्मचारी यांनी बिना रॉयल्टी रेतीची वाहतूक करताना एक ट्रक पकडून त्याला पोलीस स्टेशन वरठी येथे स्थानबद्ध केले. यात कारवाई न करण्यासाठी मोबदला म्हणून चालक राठोड यांनी ५ हजार तर, मंडळ अधिकारी नेवारे यांनी १५ हजार रुपयांची मागणी केली.
तक्रारदार यांच्या तक्रारीवरून नागपूर क्षेत्राचे पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक मधुकर गीते, भंडारा पोलीस उपअधीक्षक महेश चाटे यांच्या मार्गदर्शनात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतले. घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक कमलेश सोनटक्के, पोलीस निरीक्षक अमित डहारे, पोलीस कर्मचारी संजय कुरंजेकर, मिथुन चांदेवार, विष्णू वरठी, अंकुश गाढवे, कुणाल कडव, राजकुमार लेंडे, विवेक रणदिवे, अभिलाषा, दिनेश धार्मिक यांनी केली.
