भंडारा : नागपूर आणि भंडारा या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या महत्वाकांक्षी पुलाची निर्मिती आंभोरा येथे वैनगंगा नदीवर सुरू आहे. पुलाच्या सेंट्रिंगचे जॉक चढवीत असताना सुरक्षा अभावी एक मजूर सुमारे २५ फूट उंचीवरून अथांग नदीच्या पात्रात पडला. ही घटना रविवारी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास अंभोरा ते वेलतुर मार्गावर सुरू असलेल्या पुलावर घडली. शोधकार्यासाठी एनडीआरएफची टीम पोहचली असून वृत्तलीहेपर्यंत त्याचा शोध लागला नव्हता.
सुनील उर्फ शुभम प्रभुजी निकेश्वर (२४) रा. मेंढा आंभोरा जि. नागपूर असे वैनगंगा नदीपात्रात पडलेल्या तरुणाचे नाव आहे. भंडारा आणि नागपूर जिल्ह्याला जोडणाऱ्या या पुलाचे काम मागील तीन वर्षांपासून सुरू आहे. पुणे येथील टीएनटी कंपनीला या पुलाच्या निर्मितीचे काम आहे. या कामावर परिसरातील नागरिक मजूर म्हणून कामावर आहेत. मात्र, सुरक्षा साधनाअभावी मजूर येथे काम करीत आहे. याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणून ही घटना घडली आहे.
रविवारी पुलाच्या पिल्लरचे काम करण्यात येत होते. या पुलाचे काम ऑटोमॅटिक सिस्टीमने केले जात आहे. त्याच ऑटोमॅटिक सिस्टीमने सेंट्रींगची ही कामे करण्यात येत आहे. या सेंट्रींगचा जॉक चढविण्याकरिता शुभम हा निर्माणाधीन कामावर वरती चढला होता. जॉक चढविताना ऑटोमॅटिक सिस्टीमचा प्रेशर वाढला आणि त्यात तोल जाऊन शुभम हा सुमारे २५ फूट उंचीवरून वैनगंगा नदीच्या विस्तीर्ण पाण्याच्या पात्रात पडला. शुभम हा वैनगंगा नदीत पडल्याचे बघून उपस्थित मजुरांनी आरडाओरड करून त्याला वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र, त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले. या घटनेची माहिती ग्रामस्थांना होताच त्यांच्यात कंपनी प्रशासनाविरोधात प्रचंड असंतोष पसरला. संतप्त ग्रामस्थांनी कंपनीच्या कार्यालयाची तोडफोड केली. घटनेची माहिती होताच, नदीच्या दोन्ही भागात पोलिसांची कुमक पोहचली. घटनास्थळ हे भंडारा जिल्ह्याच्या अड्याळ पोलीस स्टेशन हद्दीत येत असल्याने ठाणेदार सुधीर बोरकुटे हे पथकासह घटनास्थळी आहेत. ते स्वतः बोटीत बसून वैनगंगा नदी पत्रात स्थानिक गोताखोरांसोबत शुभमचा शोध घेत आहे.
