Crime 24 Tass
crime24tass news

Bhandara : शासकीय धान खरेदी केंद्र हे भ्रष्टाचाराचे मोठे अड्डे शेतकऱ्यांची लुट

व्यापाऱ्यांचा फायदा करून देणा-या धान खरेदी केंद्रांवर कारवाई होणार

भंडारा : शेतकऱ्यांना त्यांच्या धानाला योग्य मोबदला मिळावा या साठी शासनाने सुरू केलेल्या शासकीय धान खरेदी केंद्र हे भ्रष्टाचाराचे मोठे अड्डे बनले आहेत. उन्हाळी धान खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याने ते वाढवून मिळण्यासाठी खासदारांनी प्रयत्न केले. उद्दिष्ट वाढले आणि पोर्टलवर नोंदणी सुरू झाली. पण अवघ्या 6 तासातच तब्बल 6 लाख क्विंटल एवढी विक्रमी धानाची खरेदी झाली. एका केंद्रावर 700 ते 800 क्विंटल धान खरेदी केली जाऊ शकते एका केंद्रावर तर तब्बल पंधरा हजार क्विंटल च्या वर धान खरेदी केल्या गेल्याचे नोंदविले गेले. उद्दिष्ट पूर्ण झाल्याने पोर्टल बंद झाले व पुन्हा एकदा खरा शेतकरी धान विक्री पासून वंचित राहिला. यात केवळ सुखावला तो व्यापारी. आता अशा गैर पद्धतीने नोंदणी करणाऱ्या ध्यान खरेदी केंद्रा विरोधात कारवाईची मागणी खासदार यांनी केली असून जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांनी त्या अनुषंगाने चौकशीला सुरवात केली आहे.

संपूर्ण महाराष्ट्रात सर्वाधिक धान्याचे उत्पन्न भंडारा गोंदिया जिल्ह्यात होते.

या धानाची खरेदी करण्यासाठी केंद्र शासन राज्य शासनाच्या मदतीने शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू करते. केंद्राकडून राज्याला धान खरेदीचे उद्दिष्ट दिले जाते. राज्य शासनाच्या चुकीच्या माहितीमुळे दोनदा कमी मिळालेले उद्दिष्ट केंद्राने वाढवून दिले. तिसऱ्यांदाही तीच वेळ आली. खासदार सुनील मेंढे यांनी सातत्याने पाठपुरावा करून हे उद्दिष्ट वाढवून घेतले. नव्याने सहा कोटी 41 लाख क्विंटल धान खरेदीचे उद्दिष्ट भंडारा जिल्ह्याला मिळाले. या खरेदीला 7 जुलै च्या दुपारी बारा वाजता पासून सुरुवात झाली.

शासकीय आधारभूत हान खरेदी केंद्रांच्या माध्यमातून धान खरेदीसाठी असलेल्या पोर्टलवर शेतकऱ्यांच्या सातबारा ची नोंद करण्यात आली. जिल्ह्यातील 106 हून अधिक केंद्रावर एकाच वेळी सुरू झालेली खरेदी प्रक्रिया अवघ्या सहा ते सात तासात संपली कारण जिल्ह्याला असलेले उद्दिष्ट या कालावधीत पूर्ण झाले. खरंतर हा एक प्रकारचा चमत्कारच म्हणावा लागेल कारण कितीही प्रयत्न केले तरी एका दिवसात एका काट्यावर 700 क्विंटल च्या वर मोजणी होऊ शकत नाही. पण असे असताना तुमसर तालुक्यातील एका केंद्रावर 15,490 क्विंटल, कुठे 9 हजार, कुठे 6 हजार तर कुठे 10 हजार क्विंटल ची खरेदी करण्यात आली. 3000 क्विंटल च्या वर खरेदी करणाऱ्या केंद्रांची संख्या जवळपास 60 च्या घरात आहे.

या विक्रमासाठी सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे मात्र या विक्रमी खरेदीतून धान खरेदीत बोकाळलेला भ्रष्टाचार उघड झाल्याचे बोलल्या जात आहे. केंद्रावर व्यापाऱ्यांनी आणलेल्या बोगस शेतकऱ्यांचे सातबारा नोंदवून धान खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण केले गेले असल्याचे समजते. यामुळे खरा आणि गरजवंत शेतकरी धान विक्री पासून वंचित राहिला आहे. ज्याच्यासाठी उद्दिष्ट वाढवून घेतले गेले तो हेतूच सफल न झाल्याने पुन्हा एकदा शेतकऱ्याची बोळवण झाली हेच खरे.
इ पीक पेरा नोंदणी मुळे ज्याच्याकडे धानाचे पीक नाही अशा शेतकऱ्यांचेही सातबारा वापरून व्यापाऱ्यांकडून बोगस खरेदी चा घाट घातला जातो. हे उघड असतानाही याकडे लक्ष दिले जात नाही. जिल्ह्यातील शेतकरी पुन्हा एकदा वाढीव उद्दिष्टाकडे नजरा लावून असेल यात शंका नाही.

कारवाई करा: खा. मेंढे
काही तासात पूर्ण झालेले धान खरेदीचे उद्दिष्ट आश्चर्यकारक धान खरेदी केंद्र संचालकांच्या मदतीने खाजगी व्यापाऱ्यांची मनमानी यातून दिसून येते. अशा केंद्र चालकांवर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांना दिले आहेत. शेतकऱ्यांनीही अशा केंद्रावरील नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांची यादी मागवून केंद्र संचालकांचे तहसीलदार आणि पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल कराव्यात असे आवाहन खासदार सुनील मेंढे यांनी केले आहे.

खरेदीची चौकशी करून कारवाई होणार: पाटील
एवढ्या मोठ्या प्रमाणात आणि कमी वेळात झालेली खरेदी शंकेला वाव देणारी आहे. नक्कीच यात गोंधळ होण्याची शक्यता असून याच्या तपासणीसाठी काही पथके तयार करून उपलब्ध आकडेवारीची सत्यता जाणून घेत दोषी आढळल्यास केंद्रांवर कारवाई करू स्पष्ट संकेत मार्केटिंग अधिकारी भारत भूषण पाटील यांनी दिले आहेत.

crime24tass
Author: crime24tass

Leave a Comment

[espro-slider id=28419]