Crime 24 Tass
crime24tass news

Bhandara Accident : ट्रॅव्हल्सची उभ्या ट्रकला धडक, दोघांचा जागीच मृत्यू

भंडारा: रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला मागून येणाऱ्या ट्रॅव्हल्सने जोरदार धडक दिली. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात जखमी झालेल्या १४ प्रवाशांवर साकोली येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात गुरुवार, १४ जुलै रोजी पहाटे साडेपाच वाजता लाखनी-साकोली रस्त्यावरील मोहघाटा जंगलात घडला. अपघाताची माहिती मिळताच गाडेगाव येथील महामार्ग पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती हाताळली. जखमींना रुग्णालयात नेण्यात आले. विस्कळीत वाहतूक सुरळीत केली.


राष्ट्रीय महामार्ग ५३ वर मोहघाटा जंगलात नागपूर ते रायपूरच्या दिशेने जाणारा ओडी ०५ बीबी ५५१० क्रमांकाचा ट्रक बंद पडला. चालकाने वाहनाच्या मागे मोठे रिफ्लेक्टर लावून मागून येणाऱ्या वाहनांना सतर्क करण्याचा प्रयत्न केला. इंडिकेटर सुरू असतानाही पहाटे साडेपाचच्या सुमारास नागपूरहून रायपूरकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्स क्रमांक सीजी ०८ एएस ०८९१ ने मागून थांबलेल्या ट्रकला धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता की, ट्रॉलच्या काचा फुटल्या. ट्रॅव्हल्समधील दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. तर १४ जखमी प्रवाशांना साकोली येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. जखमींची प्रकृती धोक्याबाहेर आहे.

गडेगावच्या वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून वाहतूक सुरळीत केली. सहायक पोलीस निरीक्षक प्रमोदकुमार बघेले यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हवालदार राजेश ठाकरे, पोलीस नायक शेखर देशकर, विनोद शिवणकर, प्रकाश तांडेकर, संजय ईश्वरकर, चालक पोलीस नायक किशोर हटवार, चालक पोलीस हवालदार बबन अतकरी यांनी ही कारवाई केली. साकोलीचे पोलिस निरीक्षक बोरकर, पोलिस उपनिरीक्षक सूर्यवंशी, वाहतूक पोलिस हवालदार अश्विन भोयर यांनी ही कारवाई पुढे केली.

crime24tass
Author: crime24tass

Leave a Comment

[espro-slider id=28419]