भंडारा :जिल्हा पोलीस प्रशासनात पोलीस नाईक पदावर कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी स्नेहल गजभिये यांची विदेश मंत्रालय दिल्ली येथून आफ्रिका खंडातील घाणा देशात निवड झाल्याने ते विदेशात सेवा देणार आहेत.
भंडारा येथील पोलीस दलात 2010 रोजी स्नेहल गजभिये दाखल झाले होते. गुन्हे शाखेत त्यांनी पूर्ण कार्यकाळ करीत असतांना त्यांना सायबर सेलची जबाबदारी दिली होती. सायबर सेलमध्ये कार्यरत असताना सायबर जनजागृती, सायबर गुन्हे प्रतिबंध, तपास व गुन्हे उघडकीस आणण्यात मोलाची भूमिका केली होती. तीन महिन्यांपूर्वी त्यांची दिल्ली येथे बदली झाली होती. दिल्ली येथील प्रशिक्षण कालावधी पूर्ण करून मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स दिल्ली यांनी घाणा देशाकरिता नियुक्ती केली आहे. त्यांच्या कामाची दखल घेत त्यांना आणखी दुसऱ्या देशात सुद्धा सेवा देणेकरिता पाठविण्यात येणार आहे. भंडारा पोलीस दलातील पोलीस कर्मचारी स्नेहल गजभिये हे आता विदेशात सेवा देणार आहेत. त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालिकारिता पोलीस अधीक्षक श्री. लोहित मतानी, अपर पोलीस अधीक्षक श्री. अनिकेत भारती, सायबर चे प्रभारी अधिकारी श्री. अभिजित पाटील यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत.
